कर्जाचा हप्ता वाढणार; आरबीआय आणखी व्याजदर वाढवण्याच्या तयारीत?

मुंबई – देशातील वाढती महागाई कमी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून तीन दिवसांची रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण बैठक सुरू झाली. बुधवारी रिझर्व्ह बॅंकेकडून पतधोरणाची घोषणा करण्यात येईल. रिझर्व्ह बक व्याजदरात 0.40 टक्क्याची वाढ करेल, अशी शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
एप्रिल महिन्यात किरकोळी महागाईने मागील आठ वर्षाचा उच्चांक गाठला. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर हा 7.79 टक्के इतका नोंदवण्यात आला. महागाईच्या या आकड्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या चिंतेत वाढ केली. सध्या रेपो दर 4.40 टक्के असून हा दर 4.75 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास कर्ज आणि कर्जाचे हप्ते आणखी महाग होणार आहे.
आरबीआयकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने कर्जे महाग होण्याची शक्यता आहे. आधीच कर्ज घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते वाढवण्याची शक्यता आहे. रेपो दर वाढल्यास नवीन कर्ज घेणाऱ्यांना अधिक व्याज दराने कर्ज उपलब्ध होईल.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून व्याज दर वाढवले जातात. याचा परिणाम सामान्यांवर होतो. गेल्या महिन्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत बॅंकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती.



