Lizard found in food – मंगरूळ (ता. जुन्नर) येथे शेतात कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांच्या जेवणात पाल आढळल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व मजुरांना तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेली माहिती अशी की, मंगरूळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वाशिम जिल्ह्यातील ३० मजूर कांदा काढणीच्या कामासाठी आले होते. त्यांच्यासाठी मालकाने सकाळी जेवण बनवले होते. जेवण झाल्यानंतर भाजीच्या भांड्यात मेलेली पाल आढळून आल्याने सर्वांचे धाबे दणाणले. काही वेळातच मजुरांना उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व मजुरांना तातडीने बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने मजुरांवर तातडीने उपचार सुरू केले. त्यापैकी २० मजुरांची प्रकृती लक्षात घेता त्यांना सलाईन लावून दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सायंकाळपर्यंत सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, सध्या सर्व मजूर सुखरूप असल्याची माहिती दिली आहे.