लोणंद -करोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेला जनावरे बाजार खरीप हंगामातील मशागतीची कामे लक्षात घेऊन संचालक मंडळाने गुरुवारपासून हा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनावरे बाजार नियमितपणे सुरू करण्याबाबत पणन संचालकांनी 20 मे रोजी पत्राने व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी 21 मे रोजी पत्राद्वारे कळविले आहे.
त्यानुषंगाने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले आणि संचालक मंडळाने येत्या गुरुवारपासून जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान राखून गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, बोकड इ.चा आठवडा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरवण्यात येणार आहे.
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या कांदा निलावात कांद्याचे भाव क्रमांक एकचा कांदा 700 ते 929, कांदा नंबर दोन 400 ते 900 आणि गोल्टी कांदा 100 ते 400 असा दर निघाला असल्याचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सांगितले आहे.