Nagar : पशुधन विकले जातेय कवडीमोल भावाने

पारनेर : शेतातील उत्पन्नाला बाजारात भाव नाही तर दुसरीकडे दुधाचे बाजारभाव घटल्याने पशुखाद्यांच्या किमती कमालीच्या घटल्या आहेत. गाईच्या दुधाचा भाव उतरल्याने एक लिटर बाटलीबंद पाण्याच्या दरात दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक नव्याने स्थापन झालेले सरकार थांबविणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
फॅट ३.५ व ८.५ एसएनएफ दुधाला ५ रूपये अनुदान देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ही घोषणा कागदावरच राहिल्याने दूध व्यवसाय शेवटच्या घटका मोजत आहे. जनावरांच्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, हेच दूध सध्या २२ ते २६ रुपये दराने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकाचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वच शेतकरी खुराक चारू शकत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत आहे.
शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे तसेच पशुखाद्यासह कडब्याच्या दरात वाढ झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असणाऱ्या गायीच्या दुधाला २६ रुपये दर दिला जात आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, प्राप्त परिस्थितीचा फायदा उचलत दूध संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.
दुधासह शेतमालाचे भाव घसरले असल्याने पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय संकटात सापडला असून दुधाचा भाव ४३ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने जनावरांसाठी आवश्यक पेंडी, भूसा याचे भाव गगनाला भिडल्यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आलेला आहे. त्यात शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
– अरूण भोगडे, दुध उत्पादक शेतकरी.
एक लिटर बिसलरीचे पाणी बनविण्यासाठी पॅकिंगसह तीन रुपये खर्च येतो. मात्र, बाजारात बिसलरी २० ते ३० रुपये लिटरने मिळते. एक लिटर दुधाला २५ रुपये उत्पादन खर्च येतो. मात्र, त्याचा दर २२ ते २६ रुपये मिळतो. हे अन्यायकारकच आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
– अविनाश पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उपाध्यक्ष
पशुधन कवडीमोल भावाने विक्रीची शेतकऱ्यांवर वेळ
दोन वर्षांपूर्वी परराज्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गायी शेतकऱ्यांनी विकत घेतल्या याला कारण म्हणजे त्यावेळी ४५ रूपये एक लिटरला बाजारभाव मिळत होता. दरम्यानच्या काळात शासनाने अनुदान सुरू केले तेही काही शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकरी अद्याप वंचित आहेत. दुधाचे बाजारभाव घटल्याने याच गायांचे गोठे शेतकऱ्यांनी रिकामे करण्यास सुरुवात केली. दुधाला बाजारभावही नाही व गाई विक्रीची संख्या वाढल्याने १ लाख ६० हजारांना विकणारी गाय सध्या बाजारात ३० ते ६० हजार रुपये विकली जात असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गाईंना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.





