भवानीनगर : आजवरच्या आयुष्यात आम्ही कधीही अशा भीषण उन्हाळ्याचा सामना केला नाही. आमच्याकडे ४०० गीर गायी आहेत, पण यंदाच्या कडक उन्हामुळे त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गायींना जिवंत ठेवण्यासाठी रोज तब्बल २० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असून, सध्याचा खर्च पेलणे अत्यंत अवघड झाले आहे, अशी आर्त हाक भवानीनगर येथील पशुपालक रघु गवळी यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गवळी कुटुंब भवानीनगर परिसरात ४०० गीर गायींचा सांभाळ करत आहे. मात्र, यंदा मे महिन्यातील तीव्र उन्हामुळे शेतातील हिरवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे. निरा डाव्या कालव्याच्या चारींना पाणी नसल्याने कडेचे गवतही सुकले आहे. त्यातच उसाची तोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नवीन पिके घेतल्याने चाऱ्याची उपलब्धता पूर्णपणे संपली आहे. दिवसभर गायींना उन्हातान्हात फिरवूनही त्यांचे पोट भरत नाही, शिवाय त्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडक उन्हात फिरूनही चारा मिळत नसल्याने या गायींना उपाशीपोटीच गोठ्यात परतावे लागत आहे. “सध्या नफा-तोटा पाहण्यापेक्षा या गायींना जिवंत ठेवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या गाईंच्या जिवावरच आमचा संसार आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा चांगले दिवस येतील, या आशेवर आम्ही सध्या कर्जबाजारी होऊनही हा खर्च सोसत आहोत,” अशी भावना रघु गवळी यांनी व्यक्त केली. आर्थिक गणित कोलमडले सध्या या ४०० गायींपैकी काहीच गायी दूध देत आहेत. दिवसाकाठी केवळ ६० लिटर दूध संकलित होते. ४० रुपये लिटर दराने या दुधातून दिवसाला २४०० रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, गायींना जगवण्यासाठी रोज सुमारे १० टन चारा विकत घ्यावा लागत असून, त्यावर दिवसाला २० हजार रुपये खर्च होत आहे. म्हणजेच, रोज सुमारे १७ ते १८ हजार रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. स्वतःची एक एकरही शेती नसताना रघु गवळी यांनी आजवर या गायींच्या जोरावर आपला प्रपंच चालवला, मात्र सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. हेही वाचा : Pune District : रोहित पवारांच्या आक्रमकतेने प्रशासनाची नरमाई