नाशिक : आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून रत्नागिरीतील खेडनंतरची दुसरी मोठी सभा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसांपासून नाशिक शहरासह मालेगावात ठाण मांडून आहेत.
दरम्यान, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल झाले आहेत. सभेची संपूर्ण तयारी झाली असून सायंकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करतील अशी माहिती मिळत आहे.
मालेगाव शहरात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठीसोबत उर्दू भाषेमध्ये देखील होर्डिंग लावण्यात आले आहेत. ‘शिवसेनेचे मालेगाव मालेगावची शिवसेना’ अशा स्वरूपाचे हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये या होर्डिंगविषयी त्याचबरोबर मालेगावमध्ये होणाऱ्या सभेविषयी उत्सुकता आहे.
तसेच ठाकरे यांच्या सभेसाठी उर्दु पोस्टर लागल्याने त्यांच्यावर भाजप-शिवसेनेकडून(शिंदेगट) जोरदार टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करताना ते आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायलाही कचरत असल्याचं म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख अली जनाब असा केला आहे. तसेच भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी देखील उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. तुषार भोसले यांनी म्हटले की, “अली जनाब उद्धव ठाकरेंनी आज मालेगावात जाळीदार टोपी घालावी आणि भाषणाची सुरुवात सुद्धा उर्दूतूनच करावी.”
मालेगाव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरे दादा भुसे यांना उद्देशून काय निशाणा साधतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्या दरम्यान केलेल्या टीकेवर ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.