Live “हरियाणातील दुधवाल्याची संपत्ती 7 हजार कोटींची; त्यात महाराष्ट्राचे साडेतीन हजार कोटी”

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांमुळे त्रस्त झालेलं महाविकास आघाडी सरकार आगामी काळात राज्यातील भाजपला लक्ष्य करणार अशी शक्यता आहे. विशेषत: शिवसेनेने तशी तयारी केल्याचं दिसून येत असून खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच सोमवारी भाजपला गर्भित इशारा दिला होता. त्यानुसार आज पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपचे प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्हाला हे सरकार पाडायचं आहे. आमची तयारी झाली आहे. आम्ही सरकार पाडणारच आहोत. तुम्ही मध्ये पडू नका, असंही त्यांनी नेत्यांनी आपल्याला सांगितलं. तसेच तुम्ही मदत केली नाही, तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशी धमकी दिल्याचं राऊत यांनी म्हटलं.
राऊत म्हणाले की, आपण शिवसेनेकडून आतापर्यंत उत्तर दिलं नव्हतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सुचना केली. आम्ही सुरुवात शिवसेना भवनातून केली असून अंत ईडीच्या कार्यालयातून आम्ही करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
हरियानातून एका दुधवाल्याची संपत्ती पाच वर्षात सात हजार कोटींची झाली. यापैकी तब्बल साडेतीन हजार कोटी रुपये, महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच मागील सरकारच्या काळातील महाआयटीचा घोटाळा २५ हजार कोटींचा असून त्यातील अमोल काळे कोण असा सवालही राऊत यांनी केला.





