Himachal Pradesh Election: भाजपने एका मंत्र्यासह 11 आमदारांना दिला डच्चू; उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपने पहिला क्रमांक पटकाविला आहे. भाजपने सर्व 68 उमेदवारांची घोषणा केली आहे. 2017च्या निवडणुकीत 44 जागा जिंकणाऱ्या भाजपने एका मंत्र्यासह 11 आमदारांना डच्चू दिला आहे. दुसरीकडे “आप’ने, 58 तर कॉंग्रेसने 46 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पुन्हा एकदा सिराज मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. कॉग्रेसने त्यांच्या विरोधात चेतराम ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये जयराम ठाकूर यांनी चेतराम ठाकूर यांचा 11 हजार मतांनी पराभव केला होता.
12 नोव्हेंबर रोजी 68 जागांसाठी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने सर्व उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपने आज गुरुवारी सहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यापूर्वी, 62 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली होती.
कॉंग्रेसने 46 उमेदवारांची घोषणा केली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या “आप’ने 58 उमेदवार जाहीर केले आहेत. 2017च्या निवडणुकीत 44 जागा जिंकणाऱ्या भाजपने एका मंत्र्यासह 11 आमदारांना डच्चू दिला आहे. दोन मंत्र्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे. तर, एका मंत्र्याची तिकीट कापून मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी
कॉंग्रेसने पहिल्या यादीत सहा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. कॉंग्रेसच पहिल्या यादीत तीन महिलांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने सहा महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसने 22 पैकी 21 आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे. किन्नौर या मतदारसंघातून कोण लढणार? याचा निर्णय कॉंग्रेसने अद्याप घेतलेला नाही.





