न्युयॉर्क :- अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने अमेरिकेच्या फुटबॉल क्लब इंटर मियामीसाठी पदार्पणाच्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करताना सामना संपण्याच्या काही सेकंदपूर्वी मेस्सीने फ्री किकवर गोल करून इंटर मियामीला लीग कप सामन्यात मेक्सिकन क्लब क्रुझ अझुल विरुद्ध 2-1 असा रोमांचक विजय मिळवून दिला. मेस्सीचा या क्लबकडून खेळतानाचा हा पहिलाच गोल ठरला आहे. मेस्सीने अशीच कामगिरी कायम राखली व आपली तंदुरुस्तीही टीकवली तर येत्या काळात तोच या संघाचा नवा कर्णधार असेल, असे संकेत इंटर मियामीचे मुख्य प्रशिक्षक गेरार्डो टाटा मार्टिनो यांनी दिले आहेत. या सामन्यात 90 मिनिटांपर्यंत 1-1 अशी बरोबरी होती. सामना संपण्याच्या काही सेकंद आधी, फाऊलमुळे इंटर मियामीला फ्री किक मिळाली. मेस्सीने बॉक्सच्या बाहेरून थेट पोस्टवर गोल केला. त्यामुळे इंटर मियामीने लिजेंड्स कप सामन्यात मेक्सिकन क्लब क्रुझ अझुलवर 2-1 असा विजय मिळवला.