LinkedIn Layoffs : जगभरातील लाखो बेरोजगार आणि व्यावसायिकांना नोकऱ्या शोधून देणाऱ्या LinkedIn मध्येच मोठ्या प्रमाणावर नोकरकपात सुरू झाली आहे. कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याने टेक क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (LinkedIn Layoffs) WARN अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जानुसार, लिंक्डइनने गेल्या आठवड्यात तब्बल ६०६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार असल्याची माहिती दिली आहे. ही कपात १३ जुलैपासून अधिकृतपणे लागू होण्याची शक्यता आहे. (LinkedIn Layoffs) या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू कार्यालयाला बसला आहे. येथे ३५२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून, त्याच कार्यालयाशी संबंधित ६६ रिमोट कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. याशिवाय सॅन फ्रान्सिस्को कार्यालयातील १०८, सनीव्हेलमधील ५९ आणि कार्पिंटेरियामधील २१ कर्मचाऱ्यांनाही नोकरी गमवावी लागली आहे. (LinkedIn Layoffs) विशेष म्हणजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी गुंतवणूक आणि महसुलात वाढ होत असतानाही टेक कंपन्यांकडून सातत्याने कर्मचारी कपात केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (LinkedIn Layoffs) यापूर्वी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, लिंक्डइन आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनीत जवळपास १७,५०० कर्मचारी कार्यरत असून, या निर्णयाचा परिणाम अंदाजे ८७५ कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. मात्र, दुसऱ्या टप्प्यात आणखी कपात होणार का याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (LinkedIn Layoffs) दरम्यान, कंपनीने अलीकडेच आपल्या तिसऱ्या तिमाहीच्या आर्थिक अहवालात महसुलात वार्षिक १२ टक्के वाढ झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चांगली आर्थिक कामगिरी असतानाही कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याने उद्योग क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (LinkedIn Layoffs)