प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या चोविसावाडी येथे गुरुवारी सायंकाळी लिफ्टच्या एका भीषण अपघातात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा इमारतीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये लिफ्टमध्ये अडकला होता. दसऱ्याच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात घडला असून मुलाने वडिलांच्या मांडीवरच जीव सोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेय साहेबराव फडतरे (११, रामस्मृती हाउसिंग सोसायटी, चोविसावाडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अमेय गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून खाली येत होता. तो लिफ्टमध्ये गेला आणि त्याने तळमजल्यावर जाण्यासाठी बटण दाबले. त्यानंतर लिफ्ट चौथ्या मजल्यावरून काही अंतर खाली गेली आणि दोन मजल्यांच्या माध्यभागी अडकली. लिफ्ट बंद पडल्याने अमेय बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी लिस्ट अचानक सुरु झाली आणि अमेयचा अपघात झाला. तो बराच वेळ अडकलेल्या अवस्थेत होता.ही बाब सोसायटीमधील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अमेयच्या आई-वडिलांना सांगितले. भेदरलेल्या पालकांनी मुलाकडे धाव घेतली. त्यांनी बेशुद्ध असलेल्या मुलाला धीर देण्यासाठी त्यांचे डोके मांडीवर घेतले. इमारतीमधील नागरिक जवळपास अर्धा तास मुलाची सुटका करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर काही नागरिकांनी ४०० मीटर अंतरावर असलेल्या चोविसावाडी अग्निशामक दलास कळविले. घटनेची माहिती आणि गांभीर्य लक्षात घेऊन चोविसावाडी, मोशी आणि अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी रवाना केला.घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलास अमेय याचे वडील त्याला अडकलेल्या अवस्थेत मांडीवर घेऊन बसलेले दिसून आले. त्यातही काही नागरिकांनी अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांना बचाव करण्यास विरोध करून लिफ्टच्या कंपनीला बोलविले असल्याचे सांगितले. मात्र अग्निशामक कर्मचारी यांनी टेरेसवर जाऊन लिफ्ट मॅन्युअल केली आणि अमेय याला बाहेर काढले. त्याला अग्निशमन विभागाच्या देवदूत वाहनातून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.