Lift Accident – तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण संस्थेची लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह ११ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश सुरंगे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश रामा सुरंगे (वय ३२, रा. किनळे, हवेली) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक हिंदराव वारके (वय ४४), दीपक अशोक हेंद्रे, विनायक बाबुराव खोराटे, निलेश बाळू गवळी, प्रविण श्रीवास, सचिन बापू शिर्के, प्रांजली सर्वेश पिंगळे, धनश्री योगेश वैद्य, वैशाली जितेंद्र बोरकर, रामभाऊ किसन साबळे, संतोष सहादू आसवले (सर्व रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ दिनेश सुरंगे लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना लिफ्टचा रोप (दोरी) तुटल्याने लिफ्ट थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला सोसायटीच्या कमिटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक खामगळ पुढील तपास करत आहेत.