कराड -अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या सुर्ली, ता. कराड येथील बंडा उर्फ नवनाथ भानुदास चव्हाण या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप आणि 50 हजार दंडाची शिक्षा कराडचे विशेष न्यायाधीश एस. ए. आर. औटी यांनी सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाकडून ऍड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले.
ही दुर्दैवी अल्पवयीन मुलगी 11 मे 2012 रोजी रात्री एका घरात टीव्ही पाहायला गेली होती. ती रात्री 10.30 वाजून गेले तरी घरी न आल्याने तिचे आई-वडील व नातेवाइकांनी तिचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस तपास करत असताना गावातील आनंदा पवार यांनी त्या मुलीला नवनाथ चव्हाण या नराधमासोबत पाहिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर 13 मे 2012 रोजी तालुका पोलिसांनी चव्हाण याच अटक केली होती. त्याने त्या मुलीस एका शेतात नेऊन बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून तिचा खून केला होता, असे तपासात निष्पन्न झाले होते. त्या नराधमाने तिचा मृतदेह एका ओघळीत पाला टाकून लपवून ठेवल्याचेही स्पष्ट झाले होते. या नराधमाने पोलिसांना स्वतः मृतदेह दाखवला होता. मुलीच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली होती. या प्रकरणी दि. 30 जून 2012 रोजी कराड तालुका पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आरोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात झाली. त्यामध्ये 15 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आनंदा पवार, डॉ. दाभोळे, तपासी अधिकारी सपोनि अशोक चौधरी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद व सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
विविध कलमांन्वये दंड व शिक्षा
नवनाथ चव्हाण याला बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंड, अपहरण केल्याप्रकरणी पाच वर्षे कैद व एक हजार रुपये दंड आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षे कैद व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा विविध कलमान्वये सुनावण्यात आल्या आहेत. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून नराधमास एकूण दोन लाख तीन हजार रुपयांचा दंड झाला आहे.