आई फितुर झाली असतानाही थोरल्या भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप : सत्र न्यायालयाचा निकाल

पुणे – मद्याचे व्यसन, कामधंदा न करता आई-वडिलांना त्रास देणाऱ्या थोरल्या भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली. दंड न भरल्यास त्याला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. याबाबत आईनेच लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र, सुनावणी दरम्यान ती फितुर झाली. तर आरोपीच्या पत्नीची साक्ष महत्त्वाची ठरली.
नीलेश बबन बोरकर (वय ३१, रा. कोंडे वस्ती, उरळी देवाची) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने भाऊ मंगेश याचा खून केल्यप्रकरणी आईने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. तर, त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ललिता कानवडे यांनी मदत केली. प्रत्यक्षदर्शी असलेल्या आरोपीच्या पत्नीचा साक्ष महत्त्वाची ठरली.
घटनेनंतर आरोपीची पत्नी न मिळाल्याने तिची टिपण नोंदवली नव्हती. मात्र, हवालदार कानवडे यांनी अथक प्रयत्नाद्वारे तिचा शोध घेतला. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे तिची साक्ष नोंदविण्यात आली. जी या खटल्यात महत्त्वाची ठरली. आरोपी नीलेशचा मंगेश हा मोठा भाऊ होता. तो काळेपडळ येथे राहत होता. घटनेच्या दिवशी उरळी कांचन येथे आला होता. त्यावेळी मंगेशला समजावून सांगताना दोघात वाद झाला. वाटण वाटायचा दगडी पाटा डोक्यात मारून नीलेशने मंगेशचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





