satara | लाल परी’मध्ये जीव गुंतला….!

कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्यातील एकंबे गावचे संजय चव्हाण. एस. टी. च्या कोरेगाव आगारामध्ये ३६ वर्षे वाहक म्हणून प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर शुक्रवारी संजय चव्हाण यांचा सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. एवढी वर्षे एसटीच्या माध्यमातून लाखो प्रवाशांच्या मनावर अधिराज्य केलेले संजूदादा आपल्या लाडक्या लाल परीला निरोप देताना प्रचंड गहिवरून गेले.
आपल्या मातृभूमी आणि कर्मभूमी असलेल्या एकंबे गावात जायगाव बसवर कर्तव्य करत असताना शुक्रवारी त्यांनी अखेरची फेरी पूर्ण केली. यावेळी एकंबे गावातील बस थांब्यावर माजी सरपंच शामराव चव्हाण व सेवानिवृत्त शेती अधिकारी अर्जुन चव्हाण यांनी संजय चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी संगीता चव्हाण यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देत सत्कार केला.
सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. ग्रामपंचायत सदस्य केतन चव्हाण, विठ्ठल शिंदे, विठ्ठल चव्हाण, एकनाथ चव्हाण, राजेश निवृत्ती चव्हाण, विश्वनाथ माने, राजू शिंदे, जयवंत शिंदे, नाना ताटे, विकास सोसायटीचे संचालक दत्तात्रय चव्हाण, बापूसाहेब शेळके यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
एसटीमध्ये त्यांचा एवढा जीव गुंतला की कोणा जवळच्या व्यक्तीपासूनच आपण दूर चाललोय या भावनेने त्यांना अस्वस्थ करून सोडले आणि रोजच्या ‘एचएच १४ बी.टी ८९७१ या क्रमांकाच्या एस.टी. तून काढता पाय घेण्याआधी त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. एस.टी. समोर हात जोडत ते ढसाढसा रडू लागले. कामाप्रती असलेली त्यांची ही निष्ठा कोरेगाव आगारातील सर्वच कर्मचाऱ्यांना तसेच प्रवाशांनाही चकीत करणारी होती.
संजय चव्हाण यांनी एसटीमध्ये वाहक म्हणून ३५ ते ३६ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. ग्रामीण भागातील रस्ते कितीही खड्ड्यांचे असो वा कुठल्याही दुर्गम भागात गाडी न्यायची असो, संजय चव्हाण यांनी कधीच कुरकुर केली नाही. त्यांनी सेवा देताना वक्तशीरपणा अधिक काटेकोरपणे जपला.
ते प्रचंड वक्तशीर असल्याचे प्रवाशांना चांगलेच ठाऊक झाले होते. त्यामुळेच वर्षानुवर्षे धावणाऱ्या कोरेगाव आगारातील लांब पल्ल्याच्या बसमधील प्रवासी आणि संजूदादा हे घट्ट नाते जोडले गेले.
एसटीला मारली घट्ट मिठी
एसटीच्या सेवेतून निवृत्त होणे संजूदादांच्या मनाला रुचलेले नाही. पण निवृत्तीपुढे त्यांच्या हाती दुसरा पर्याय उरलेला नाही. निवृत्ती स्वीकारताना त्यांनी आपल्या रोजच्या एसटीला घट्ट मिठी मारली.
त्यांच्यासारख्या निष्ठावान कर्मचाऱ्यांमुळेच आजही एसटी लाखो प्रवाशांच्या मनावर अधिराज्य करत आहे. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीचे वृत्त कळताच प्रवासीही गहिवरले.





