Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेने राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई करत कराडमधील यशवंत सहकारी बँकचा परवाना रद्द केला आहे. घोटाळा प्रकरणामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या या बँकेचे सर्व व्यवहार आता आज म्हणजेच 19 मेपासून बंद करण्यात आले आहेत. यामुळे नवीन ठेवी स्वीकारणे, कर्ज वितरण तसेच खातेदारांना पैसे परत देणे अशा सर्व बँकिंग सेवा बंद करण्या आले आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार, फलटणस्थित यशवंत बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत झाली होती. बँकेकडे पुरेसे भांडवल नव्हते आणि भविष्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता देखील अत्यल्प असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे बँक पुढे चालवणे ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक ठरू शकते, असे स्पष्ट करत आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत बँक ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत आर्थिक निकषांची पूर्तता करत नसल्याचेही समोर आले आहे. बँकेला सर्व ठेवीदारांचे पैसे परत देणे शक्य नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून ही बँक आरबीआयच्या निर्बंधाखाली होती आणि खात्यांमधून पैसे काढण्यावर मर्यादा लागू करण्यात आल्या होत्या. ठेवीदारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, प्रत्येक खातेदाराला पाच लाख रुपयांपर्यंत ठेव विमा संरक्षण मिळणार आहे. DICGC कडून मुद्दल आणि व्याज मिळून 5 लाखांपर्यंतची हमी दिली जाते. बँकेच्या माहितीनुसार, तब्बल 99.02 टक्के ठेवीदारांच्या ठेवी या मर्यादेत असून त्यांना संपूर्ण रक्कम मिळणार आहे. फक्त 0.98 टक्के खातेदारांच्या ठेवी 5 लाखांपेक्षा अधिक आहेत. अशा खातेदारांना उर्वरित रकमेसाठी लिक्विडेशन प्रक्रियेत दावा करावा लागणार आहे. 20 एप्रिल 2026 पर्यंत DICGC ने ठेवीदारांच्या दाव्यांसाठी 106.96 कोटींचे वितरण केले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बँकेची मालमत्ता विकून उर्वरित देणी फेडण्यासाठी लिक्विडेशन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी लिक्विडेटर नेमला जाणार असून खातेदारांनी आपल्या शाखेशी संपर्क ठेवण्याचा तसेच आरबीआय आणि DICGC च्या अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेही वाचा : Pune District : भोर-राजगडमध्ये पर्यावरणीय संकट गडद