नगर जिल्ह्यात सहा कृषी केंद्रांचा परवाना निलंबित

नगर – कापूस बियाणे चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
खरीप हंगाम सन 2023-24साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर, तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर 1 व तालुका स्तरावर 1 अशी एकूण 15 भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आली आहेत. भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्या विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या 4 बियाणे विक्री केंद्रांचे व 2 कीटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यातील निविष्ठा विक्री केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये; अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर कृषी विभाग सक्रिय झाला आहे.





