नवी दिल्ली – लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन म्हणजे एलआयसीने जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार या कंपनीने अदानी समूहातील विविध कंपन्यात केलेली गुंतवणूक नियमाप्रमाणे केली आहे. प्रत्येक कंपनीची शहानिशा करूनच ही गुंतवणूक करण्यात आली असल्याचे एलआयसीने स्पष्ट केले. अदानी समूहातील कंपन्यात एलआयसीने गुंतवणूक करून या कंपन्यांना मदत केली असल्याचा आरोप वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने केल्यानंतर एलआयसीने हे स्पष्टीकरण केले आहे. यासंदर्भात एलआयसीने समाज माध्यमावर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाकडून कसलाही सल्ला घेतलेला नाही किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून गुंतवणुकीसंदर्भात कसलाही सल्ला घेण्यात आलेला नाही. एलआयसीच्या संचालक मंडळाने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या चौकटीतच एलआयसी गुंतवणूक करीत असते असे सांगण्यात आले. एलआयसी आपल्या नियमाप्रमाणे भारतातील सर्वात मोठ्या 500 कंपन्यांमध्ये वेळोवेळी गुंतवणूक करीत असते किंवा गुंतवणूक काढून घेत असते. 2014 मध्ये एलआयसीने विविध कंपन्यात केलेली गुंतवणूक 1.56 लाख कोटी रुपये होती. यात 2025 मध्ये दहा पटीने वाढ होऊन ही गुंतवणूक 15.6 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. अदानी समूहातील कंपन्यावर अमेरिकेमध्ये गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आल्यानंतर अमेरिकेत या कंपन्या संदर्भात चौकशी चालू होती. त्यावेळी अदानी समूहाला मदत करण्यासाठी भारतातील अधिकार्यांनी एलआयसीला अदानी समूहातील कंपन्यात गुंतवणूक करण्याची सूचना केली होती असा आरोप वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने केला होता. त्यावेळी अमेरिकेत अदानी समूहाविरोधात चौकशी चालू असतानाच अदानी समूहावरील कर्जाचा बोजा वाढला होता. यातून अदानी समूहाला बाहेर पडण्यासाठी एलआयसीची गुंतवणूक उपयोगी पडली असा आरोप करण्यात आला आहे. एलआयसीच्या निर्णय प्रक्रियेवर कोणीही दबाव आणलेला नाही किंवा आणू शकणार नाही. एलआयसी ही संस्थागत गुंतवणूकदार आहे. विविध कंपन्यांचा अभ्यास करून जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी एलआयसी गुंतवणुकीचे निर्णय घेत असते. कंपनीची प्रतिमा मलीन करण्यासाठी वॉशिंग्टन पोस्टने असा आरोप केला असल्याचे एलआयसीने नमूद केले आहे. संस्थागत गुंतवणूकदार असलेल्या एलआयसी एकूण मालमत्ता 41 लाख कोटी म्हणजे 500 अब्ज डॉलरची आहे. एलआयसीने शेअर बाजारावर नोंदलेल्या 351 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. कंपन्याबरोबरच गुंतवणूक करताना एलआयसी आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या कर्जरोख्यातही वेळोवेळी गुंतवणूक करीत असते. अदानी समूहावर जेवढे कर्ज आहे त्याच्या केवळ दोन टक्के इतकी गुंतवणूक एलआयसीने केली असल्याच्या बाबीकडे एलआयसीने लक्ष वेधले. त्याचबरोबर एलआयसीमध्ये अमेरिका, जपान आणि इतर देशातील संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत. अदानी समूहावर केवळ 2.6 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर समूहाचा वार्षिक नफा 90,000 कोटी आणि रोख रक्कम 7,000 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत नवीन गुंतवणूक न केल्यास अदानी केवळ तीन वर्षात हे कर्ज फेडू शकतात असे स्पष्ट करण्यात आले.