satara | मुलांना मोबाइलमधून बाहेर काढण्यासाठी ग्रंथालय हाच पर्याय

सातारा, (प्रतिनिधी)- ज्या गावातील शाळेचा विकास योग्य दिशेने होत असतो, ते गाव जागं असल्याचं प्रतीक असते. ज्ञान मंदिराचा काळाप्रमाणे विकास होत जातो. काळ, काम आणि वेगाचे भान असणारे गाव विकसित होते. मुलांना मोबाइलमधून बाहेर काढण्यासाठी ग्रंथालय हाच पर्याय आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
धावडशी (ता. सातारा) येथील श्री ब्रह्मेंद्रस्वामी विद्यालयात शाळेचे प्रथम मुख्याध्यापक गजाननराव श्रोत्री यांच्या स्मरणार्थ श्रोत्री कुटुंबीयांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्रंथालयाचे उदघाटन श्री. लवटे, कूपर कार्पोरेशनचे नितीन देशपांडे, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, श्रीराम नानल,
अशोक वाळिंबे, ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम आदींच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी श्री. लवटे बोलत होते. अध्यक्षस्थानी सुमित्रा श्रोत्री होत्या. मोबाइलच्या अतिरेकी वापरामध्ये मुलांचा अपराध नाही. तो पालकांचा आहे. ही पालकांची पिढी प्रायश्चित्त घेणारी आहे.
म्हणून ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न ती करत आहे,असे श्री. लवटे यांनी सांगितले. मुलांवर शिक्षकांचा विश्वास असला पाहिजे. पुस्तकांचं वैभव म्हणजे वाचन आहे. पुस्तकाच्या चिंध्या करा; पण वाचून करा, असे सांगून श्री. लवटे म्हणाले, ‘‘मोफत व विकतचं पुतक वाचन यात फरक आहे. पुतकासाठी पैसे खर्च पुस्तकांनी चैन करतो तो समृद्ध असतो. महाराष्ट्राला सांस्कृतिक शाप आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यामध्ये महाराष्ट्र असंस्कृत बनला आहे.
त्याचे लक्षणं म्हणजे आपल्या घरात पुस्तके नाहीत. भौतिकदृष्ट्या आपण संपन्न झालोय. आयटीमुळे घराघरात डॉलर आलेत. पण घरात माणसं नाहीत तेवढ्या गाड्या आल्यात आणि वाचनाला उसंत नाही. बंगलामध्ये पुस्तकांच्या पाच हजारची आवृत्ती निघतात. आपल्या मराठीच्या मात्र, शंभरही निघत नाहीत. वाचनाचा वारसा निर्माण केला तरच पुस्तके आपल्याला सुसंस्कृत करतील.
डॉ. गिरीश पेंढारकर आणि डॉ. संदीप श्रोत्री धावडशीची शाळा आधुनिक करत आहेत. मात्र, भरपूर देशातील शाळांमधील वर्ग आता काँक्रिटच्या भिंती नाहीत. तिथे व्हर्च्युअल भिंती आहेत. तशा पद्धतीने धावडशीच्या मुलांना शिक्षण मिळावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शाळेचा १९८३ पासूनचा प्रवास संस्थेचे अध्यक्ष गिरीश पेंढारकर यांनी उलगडून सांगितला. शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न होत असून अवांतर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा यज्ञ मांडला असे त्यांनी सांगितले.
ग्रंथालयाच्या अनुषंगाने शाळेने विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा डॉ. संदीप श्रोत्री यांनी व्यक्त केली. शाळेला ग्रंथालय देण्याची संकल्पना कशी सुचली हे सांगून डॉ, श्रोत्री यांनी या ग्रंथालयासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीमती सुमित्रा श्रोत्री, डॉ. मनीषा आंधळगावकर, अशोक वाळिंबे, शिरीष चिटणीस, वासुदेव कुलकर्णी, नितीन देशपांडे, डॉ. प्रशांत रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप भागवत, धनंजय भागवत, सरपंच अरुण कारंडे, बाळासाहेब साळुंखे, प्रभाकर पवार, आदी प्रमुख उपस्थित होते. वैदेही कुलकर्णी आणि संगीत शिक्षक श्री. कोरे यांनी सूत्रसंचालन केले. शाळेचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी आभार मानले.

