वाई : दक्षिण काशी असा नावलौकिक असलेले वाई शहर विकासापासून दूर आहे. विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्यानेच वाई शहराची अवस्था बकाल झाली आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पक्षाच्या माध्यमातून वाई शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वाईकरांनी भाजपला बहुमत द्या, वाई शहराचा कायापालट करून दाखवू, अशी ग्वाही माजी आमदार मदन भोसले यांनी दिली. वाई नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत व पक्षाच्या इतर उमेदवारांचा नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे. सर्वच प्रभागात भाजपने कोपरा सभा, रॅलीचे आयोजन केले,. त्याला वाईकर नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. कोपरा सभेत माजी आमदार मदन भोसले म्हणाले, ‘भाजपकडे विकासाचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाईल.’ नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत म्हणाले, ‘‘ठराविक घरातील प्रस्थापितांनी वाई शहराला ताब्यात ठेवले आहे. त्यांच्या ‘हम करे सो कायदा’ या प्रवृत्तीमुळे वाई नगरपालिका विकासाच्या मुद्द्यांपासून भरकटली आहे. पालिकेत भ्रष्टाचार, मनमानी वाढली असून या अपप्रवृत्तीना हद्दपार करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही.’’ वाई शहरातील सर्व प्रभागात पदयात्रा व कोपरा सभाहोत असून भाजपच्या उमेदवारांना प्रतिसाद देण्याचे आवाहन पक्षातील नेते व कार्यकर्त्यांकडून होत आहे.