भोपाळ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दौऱ्यासाठी दाखल होण्याआधीच भारताच्या आर्थिक धोरणांना विरोध दर्शवत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परममित्र ट्रम्प काय शिकवून जातात ते पाहू, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा मोठा गाजावाजा होत आहे. मात्र, त्या दौऱ्याआधी ट्रम्प यांनी भारताच्या व्यापारविषयक धोरणांबाबत प्रतिकूल मत मांडले. एवढेच नव्हे तर, आपल्या दौऱ्यावेळी भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले. तो धागा पकडून कॉंग्रेसने ट्रम्प यांचा दौरा भारताचे हित जपणारा ठरावा अशी भूमिका मांडण्यास सुरूवात केली आहे.
आता दिग्विजय यांनीही ट्विटरवरून टिप्पणी केली आहे. त्यांनी 2015 मधील अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याचीही आठवण करून दिली. ओबामा यांनी त्यांच्या दौऱ्यात मोदींना राज्यघटनेचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, संपूर्ण राज्यशास्त्राचे ज्ञान असणाऱ्या मोदींनी नेमके उलट काम केले, असा शाब्दिक टोलाही दिग्विजय यांनी लगावला.