पुणे -वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे गेला असून, पक्षी पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. त्यामुळे पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी घराच्या बाहेर त्यांच्यासाठी पाणी ठेवल्यास त्यांची तहान भागेल. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पक्षी, प्राण्यांचे दर्शन होताना दिसत आहे. चिमण्या घरांच्या खिडक्यांच्या दारावर “टक टक’ करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात मोशी परिसरात पाण्याच्या शोधात मोर आल्याचे दिसून आले. पक्ष्यांची निवासस्थाने हिरावून घेत सिमेंटची जंगले उभारण्यात आली आहेत. तसेच पाणवठेही नाहीसे झाल्याने पक्ष्यांना पाण्याच्या शोधात शहर आणि परिसरात वावर वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मे महिन्याऐवजी फेब्रुवारीतच अंगाची लाही लाही होत आहे. त्यात पक्षीही मागे राहिलेले नाहीत. त्यामुळे हे पक्षी जगविण्यासाठी घराच्या बाहेर, बाल्कनी, टेरेस, खिडक्यांमध्ये पाण्याची सोय करावी, असे आवाहन पक्षीप्रेमी करीत आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम गेले वर्षभर वातावरणात सतत बदल जाणवत आहे. मध्येच उन, पाऊस आणि थंडी असे वातावरण शहरवासियांनी अनुभवले. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा माणसांबरोबरच पक्ष्यांवरही दुष्परिणाम झाला. यंदा फेब्रुवारीमध्ये तापमानाचा पारा 36 अंशावर गेला आहे. उकाडा असहाय्य बर्ड फीडर चिमणी आणि तत्सम लहान पक्ष्यांचा घराभोवती वावर वाढविण्यासाठी तयार घरटी खिडकीबाहेर लावण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून शहरात रूजत आहे. त्यामुळे अनेक जण हे फीडर लावता. यामध्ये चिमणीइतके लहान पक्षी दाणे टिपू शकतात. शिवाय पाण्याची भांडी सध्या पाणवठे, नळकोंडाळे, पाणपोईचे प्रमाण कमी झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा साठा आढळत नाही. नदी, ओढ यांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे जलचरांचा मृत्यू होताना दिसतो. वाढते प्रदूषण, शहरीकरण आणि कॉंक्रीटीकरणामुळे तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्राणी-पक्षी जगले पाहिजेत. त्यांच्यासाठी पाण्याने भरलेली मातीची भांडी शक्य तेथे ठेवावीत. – उमेश वाघेला, पक्षीमित्र.