नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात साधूग्राम उभारणीसाठी प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीवरून निर्माण झालेल्या वादावर राज्याचे मंत्री आणि कुंभमेळा प्रभारी गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना महाजन यांनी, “एका झाडाच्या बदल्यात आम्ही १५झाडे लावणार आहोत. त्यामुळे या विषयाचा राईचा पर्वत करू नका,” असे आवाहन केले आहे. कुंभमेळ्यासाठी तपोवनातील जागा साधूग्रामसाठी आरक्षित आहे. या जागेवरील झाडे तोडण्यास वृक्षप्रेमींकडून विरोध होत आहे. सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त करत महाजन यांना जबाबदार व्यक्ती म्हणून उत्तर देण्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, “ही जागा कोणाच्या घशात घातली जात नाहीये किंवा इथे झाडे तोडून रेस्टॉरंट बांधले जाणार नाही. कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो. सरकार वृक्षतोडीच्या बाजूने नाही.” झाडे काढणार हे सत्य असले तरी, “आम्ही १ हजार झाडे काढणार असू, तर त्या बदल्यात १५ हजार झाडे लावणार आहोत. हैदराबादवरून ही झाडे आणली जातील आणि झाडे लावण्याचे काम आधीच सुरू झाले आहे. या उपक्रमाने उलट जंगल वाढणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. सयाजी शिंदे यांचे समाधान झाल्यावरच आम्ही झाडे लावू, अशी समजूतदार भूमिकाही महाजन यांनी घेतली.