अभिनेत्री आयेशा झुल्का : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान
लोणावळा – लोणावळा शहराला स्वच्छतेच्या प्रत्येक अभियानात नंबर एक बनवायचे आहे. याकरिता प्रत्येक नागरिकांचे एक पाऊल पुढे यावे, असे आवाहन सिनेअभिनेत्री आयेशा झुल्का यांनी लोणावळाकर नागरिकांना केले आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच सिनेअभिनेत्री आयेशा झुल्का यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, सोसायटी फॉर अँनिमल ऍण्ड रेस्क्यू संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितेश खरे, सभापती आरोही तळेगावकर, नगरसेविका पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, मंदा सोनवणे, सुवर्णा अकोलकर, बिंदा गणात्रा, रचना सिनकर, राजू बच्चे, संजय घोणे, दिलीप दामोदरे, शिवदास पिल्ले, गौरी मावकर, सेजल परमार, विशाल पाडाळे, रामविलास खंडेलवाल, प्रमोद गायकवाड, विजय सिनकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आयेशा झुल्का म्हणाल्या की, स्वच्छतेचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, लोणावळा नगरपरिषदेने शहराला स्वच्छ करण्यासाठी कंबर कसली आहे. शहराला सर्वच ठिकाणी नंबर वन बनविण्याकरिता सर्वांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. लोणावळा नगरपरिषदेच्या सहयोगाने येत्या 19 डिसेंबर रोजी ऍनिमल अवेरनेस कार्यक्रम घेण्यात येणार आहे, तसेच 20 डिसेंबर रोजी ऍनिमल फिडर ड्राईव्ह आयोजित करण्यात आला असल्याचे सांगत यापुढे लोणावळा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे झुल्का यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाले की, नागरिकांच्या सहयोगाशिवाय शहर स्वच्छ करणे अशक्यप्राय होते, मात्र सर्व नागरिकांनी या अभियानात सदैव साथ दिली आहे. घरोघरचा कचरा हा घंटागाडीतच टाकावा, शहरातील सर्व मुलभूत गरजा पूर्ण झाल्या असून, यापुढील काळात शहराच्या पर्यटन विकासावर काम करायचे असल्याचे सांगितले.
मुख्याधिकारी रवी पवार प्रास्ताविकात म्हटले की, स्वच्छ सर्वेक्षणातून नागरिकांना स्वच्छतेची आवड व सवड निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील सर्व नगरपालिका काम करत असल्याने देश स्वच्छ होऊ लागला आहे, तसेच हागणदारीमुक्त होऊ लागला आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, जिंगल स्पर्धा, म्युरल्स स्पर्धा, शॉर्ट मूव्हिज स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यासह विविध स्पर्धामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.