चला आळंदीला जाऊ। ; माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आजपासून

श्री गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने होणार सुरुवात
टाळ, पखवाजाची दुकाने सजली
विक्रेत्यांची दुकाने उभारणीची लगबग
इंद्रायणी घावाटवर वाढतेय गर्दी
आळंदी : चला आळंदीला जाऊ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू॥
होतील संतांचिया भेटी।
सांगू सुखाचीया गोष्टी ॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी म्हणता चुकती फेर॥
जन्म नाही रे आणिक ।
तुका म्हणे माझी भाक॥
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी वारी सोहळ्याला मंगळवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता बाळासाहेब पवार, हैबतरावबाबा वंशज प्रतिनिधी यांच्यातर्फे श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होऊन सुरुवात होणार आहे. शनिवारी (दि. 9) कार्तिकी एकादशी तर सोमवारी (दि. 11) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देश-राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
हैबतबाबा यांच्या दिंडीचे सोमवारी (दि. 4) सायंकाळी आगमन झाले असून मंगळवारी (दि. 5) पंढरपूर येथून प्रस्थान झालेल्या श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज यांसह विविध संतांच्या दिंडी माऊलींच्या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होणार आहेत. यासह राज्यातील विविध भागातूनही अनेक संतांच्या दिंडी दाखल होत आहेत. यावर्षी 7 लाखावर भाविक सोहळ्यासाठी येतील या दृष्टीने संस्थान कमिटी, पोलीस, वैद्यकीय, नगरपरिषद प्रशासनाने तयारी केली आहे.
विक्रेत्यांची दुकाने उभारणीची लगबग
आळंदीच्या या कार्तिकी यात्रेला लाखो भाविक येत असतात. 4-5 दिवस ही यात्रा चालते. यात्रेत विक्रिसाठी विविध ठिकाणाहून विक्रेते येत असतात. बहुतांश विक्रेत्यांनी आपल्या जागा ठरवून घेतल्या असून त्या जागेवर तात्पुरते दुकान उभारणीची कामे सुरु केली आहेत. चाकण चौक येथील नगरपरिषद पार्किंगमध्ये विक्रेते दुकान उभारताना दिसून येत होते.
टाळ, पखवाजाची दुकाने सजली
कार्तिकी यात्रेसाठी आलेले भाविक हे बहुतांश वारकरी संप्रदायातील असतात. राज्यातील गावागावात कीर्तन, भजन, हरिपाठ असे वारकरी संप्रदायीक कार्यक्रम सातत्याने होत असतात. या कार्यक्रमांसाठी टाळ, पखवाज, वीणा, हार्मोनियम हे साहित्य गरजेचे असते. या साहित्यांची आळंदीतील प्रदक्षिणा रस्त्यावर दुकाने असून ती आता सजली आहेत. यात्रेला आलेले भाविक आळंदीतून हे भजनी साहित्य खरेदी करत असतात. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची या साहित्यांची उलाढाल होते.
इंद्रायणी घाटावर वाढतेय गर्दी
यात्रेला आलेले भाविक हे आपल्या नियोजित ठिकाणी एखाद्या धर्मशाळेत, मठात, वारकरी आश्रमात ठराविक भिशी भरून मुक्कामासाठी असतात. तर ज्यांची कुठे सोय नाही असे अनेक लोक घाटावर आपले बस्तान मांडत असतात. इंद्रायणी घाटावर आता हळूहळू गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे.
प्रशासनाचे चोख नियोजन
यात्रेला येणार्या लाखो भाविकांना सेवा, सुविधा, सुरक्षा पुरविण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर असते. त्यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, नगरपरिषद, माऊली संस्थान कमिटी यांच्या संयुक्त तसेच विभागवार बैठका सातत्याने सुरु आहेत. भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रसासनाकडून चोख व्यवस्था केली जात आहे. जवळपास सर्व विभागाची तयारी पूर्णत्वास आली असून प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
आज मंदिरात होणारे कार्यक्रम –
कार्तिक वद्य अष्टमी, मंगळवारी (दि. 5) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11.30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 9 वाजता हभप बाळासाहेब पवार हैबतरावबाबा वंशज /प्रतिनिधी यांच्या तर्फे वै. हैबतबाबा पायरी पूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6 ते 8 वाजता वीणा मंडपात योगीराज ठाकूर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8 ते 8. 30 धुपारती, रात्री 9 ते 11 वीणा मंडपात बाबासाहेब आजरेकर यांचे तर्फे कीर्तन सेवा. रात्री 10 ते 12 हैबतबाबा पायरीच्या पुढे वासकर महाराज, 12 ते 2 मारुतीबुवा कराडकर, रात्री 2 ते 4 हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे जागर सेवा.





