हैदराबाद – केरळातील वायनाड मतदार संघातूनही राहुल गांधी हे निवडणूक लढवणार आहेत. पण त्यांना आम्ही डावे पक्ष एकजुटीने विरोध करून त्यांना तेथे पराभूत करू असा निर्धार कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एस सुधाकर रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. या मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पी. पी. मुनीर हे डाव्या आघाडीचे उमेदवार आहेत. रेड्डी म्हणाले की राहुल गांधी यांनी येथून उमेदवारी जाहीर केली असली तरी आम्ही त्यांच्या बाबतीत फार चिंता करीत नाहीं. आम्ही त्यांना कडवी लढत देऊ आणि त्यांना तेथून पराभूत करू.
आपण स्वत: 10 एप्रिल पासून वायनाड मतदार संघात आमच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही आमचा उमेदवार मागे घ्यावा अशी सुचना आम्हाला केली जात आहे पण आम्ही ती सूचना मान्य करणार नाही. राहुल गांधी यांनी भाजप मजबूत असलेल्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता तर आम्ही त्यांना मदत केली असती असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. डावी आघाडी कठोरपणे भाजपला विरोध करीत आहे अशा स्थितीत राहुल गांधी यांनी डाव्यांच्या मतदार संघातून निवडणूक लढवणे योग्य नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे.