शिरूर येथे शिवस्वराज्य यात्रेत सरकारवर केली कडाडून टीका
शिरूर – काही लोक पक्षांतर करतात. ज्याला जायचे त्याला जाऊ द्या असे सांगत नवीन चेहरे व तरुणांना संधी देण्यात येईल. राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत आहेत. तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये नाचतात त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही. आपण राज्याचे प्रमुख आहात, जनतेवर संकट असताना अडचणीतील माणसांना मदत करायची असते, असा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा शिरूर शहरात आली असता ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र असा सवाल केला. जे सोबत येतील त्यांच्यासह राष्ट्रवादीचा विजयाचा झेंडा रोवू. असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शिरूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील
विधानसभा निवडणुकीला आघाडीच्या पावणेदोनशे जागा निवडून आणायच्या आहेत. जिल्ह्यातील विधानसभेचा जागांसह पुणे शहरातील जागा आल्या पाहिजेत. बारामतीत मी स्वतः अजित पवार, परळीत धनंजय मुंडे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेला उमेदवारी असणार आहे. शिरूरचा उमेदवार हे शरद पवार ठरवतील.कार्यकर्त्यांनी हेवेदावे ठेवू नका. विधानसभेला ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करा राज्यात आघाडीचे सरकार आणण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले.