“विरोधकांना काय बोलायचंय ते बोलू द्या….”-आदित्य ठाकरे

मुंबई – देशासह महाराष्ट्र्रात देखील करोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल (दि. ४) राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे पुत्र ‘आदित्य ठाकरे’ यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपलब्ध कोविड रुग्णालय, रुग्णवाहिका, रुग्णांना मिळत असलेल्या जेवणाची गुणवत्ता यासारख्या विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. “विरोधकांना काय बोलायचंय ते बोलू द्या, सध्या करोनाच्या संकटाशी लढणे हीच आमची प्राथमिकता आहे. बाकीच्या सर्व गोष्टी नंतर”. असं ठाकरे म्हणाले. सध्या विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाणा बनवले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, विरोधक सरकारवर टीका करीत आहेत की करोनाची परिस्थिती सरकारने व्यवस्थित हाताळलेली नाही. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांना त्यांचं काम करु द्या, आम्ही आमचं काम करीत राहणार आहोत. सध्या आमची प्राथमिकता ही करोनाच्या संकटाशी लढा देणे आणि संसर्ग वाढीची साखळी तोडणे हीच आहे. इतर बाबी आमच्यासाठी दुय्यम आहेत.”
दरम्यान, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा पत्ता शोधणे तसेच क्वारंटाइन सेंटर्समध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे, यावर आदित्य ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील बैठकीदरम्यान भर दिला. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला आदेश दिले की, पालिकेने उभारलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील जेवणासह तिथल्या सुविधांचा आढावा घेत रहा. त्याचबरोबर करोनाच्या चाचण्या वाढवण्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित होते.





