निवडणूक होऊ द्या, खोट्या खटल्याचे बघतो

चाकण येथे शरद पवारांचे भाजपवर शरसंधान : दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ घेतली सभा

चाकण – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यावर भाजप सरकार यंत्रणेवर दबावतंत्राचा वापर करून गुन्हे दाखल करीत आहेत; मात्र घाबरण्याचे कारण नाही, निवडणूक होवू द्या, अशा खोट्या खटल्यांचे काय करायचे ते आपल्याच हातात आहे, असे रोखठोक प्रतिपादन करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 11) शरद पवार यांची चाकण (ता. खेड) येथील मार्केटच्या भव्य प्रांगणात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार रामभाऊ कांडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल राक्षे, ऋषिकेश पवार, रामदास ठाकूर, अरुण चांभारे, बाळशेठ ठाकूर, निर्मला पानसरे, संध्या जाधव, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, भास्कर तुळवे, जमीर काझी, गुलाब गोरे, वंदना सातपुते भगवान मेदनकर, राहुल नायकवाडी, जया मोरे, मनोहर वाडेकर, निलेश कड, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांच्यासह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी विविध संस्था संघटनांनी राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला. विविध गावचे सरपंच, सदस्य यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

पवार म्हणाले की, या देशात काय चालले तेच समजत नाही. भाजप शासन हे गोर-गरीब कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्यासाठी नव्हे तर बड्या लोकांसाठी आहे. सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भाजप शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा नुसता देखावा करीत आहेत. अजूनही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. गुन्हेगारी वाढली, अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवे. राज्याला पुन्हा आर्थिक दृष्ट्‌या सक्षम करायचे असेल तर सत्ता परिवर्तन करण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावे. खेड तालुक्‍यात गुन्हेगारी वाढली असून दिलीप मोहिते यांच्याकडे तालुक्‍याचे नेतृत्व आल्यानंतर ते अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना वठणीवर आणतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

खेड तालुक्‍यात सामान्य माणसाला जगणे अवघड आहे. गुन्हेगारी वाढली आहे. तालुक्‍याचे आमदार सांगतात तालुक्‍यात शांतता आहे; मात्र तालुक्‍यात गुन्हेगारी फोफावली आहे. स्थानिकांना रोजगार नाही. पाच वर्षे दिलीप मोहिते सत्तेवर नसल्याने जनतेला मोहितेंची किंमत कळाली. पाच वर्षांत तालुक्‍यात काहीही विकासकामे झाली नाहीत. तालुक्‍यातील जनतेचा विकास केला नाही, आमच्यावर टीका करायचे एमआयडीसीत दादागिरी केली, आता एमआयडीसीमध्ये कुणाची दादागिरी आहे? याची खुशाल चौकशी करा. तालुक्‍यातील जनतेला मागील पाच वर्षांत पश्‍चाताप करण्याची वेळ आली आहे.
– दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार


राज्याच्या अधोगतीला भाजप शासन जबाबदार आहे. भाजप सरकारच्या विविध निर्णयांकडे लक्ष वेधत वाभाडे काढले. चाकणमधील या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने मोहिते यांचा विजय निश्‍चित आहे.
– दिलीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष, विधानसभा

Leave A Reply

Your email address will not be published.