Sushma Andhare : ‘माझा भाऊ मंत्री होऊ दे’; सुषमा अंधारेंचं वक्तव्य, चर्चांना उधाण
Sushma Andhare : परळीतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत त्यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत मोठं भाष्य केलं.

Sushma Andhare : भाऊबीजेच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे.
परळीतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत त्यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत मोठं भाष्य केलं. ‘भाऊ माझा मंत्री होऊ दे’ असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
परळी येथील एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावरून बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, परळीला सत्ता केंद्र असण्याची सवय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा उल्लेख माजी मंत्री असा करताना वेगळंच वाटतं. भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देते. ‘भाऊ, इडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे,’ असं म्हणत त्यांनी मिश्किल अंदाजात ‘मी मात्र इडा-पिडा जाऊ दे आणि भाऊचं राज्य येऊ दे, असं म्हणेन. पुढच्या दिवाळीला तुमचा उल्लेख मंत्री म्हणूनच करेन,’ असं विधान केलं.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. अशा राजकीय पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत व्यक्त केलेली अपेक्षा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. अंधारे यांच्या या विधानामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कमबॅकच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली असून, आगामी काळात त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





