‘मला आरक्षण शांततेत घेऊ द्या. मग विरोध करणाऱ्या एक एकाला’ – मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे लाखोच्या संख्येत मराठा बांधवांचा मोर्चा निघाला आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता भगवं वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी लोणावळ्यात दाखल झाले आहे.
अशात लोणावळ्यात आंदोलकांशी संवाद साधतांना मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहेत, ज्यांनी अपमान केला त्यांचा हिशेब चुकता करणार असे ते म्हणाले. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही.’ असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
ते पुढे म्हणाले,’आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहे, दिलेला शब्द पाळणारे आहे, हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. आम्ही या भूमिकेवर कालही ठाम होतो, आजही ठाम आहे ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण शांतेतच हवे आहे, मला आरक्षण शांततेत घेऊ द्या. मग विरोध करणाऱ्या एक एकाला पाहतो. मराठा समाजा विरोधात बोलणाऱ्यांना बंद करतो. मराठा समाजात ही एकजूट अशीच कायम ठेवा. मी तुमचा शब्द मोडणार नाही, तुम्ही माझा शब्द मोडू नका. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन बंद होणार नाही. आंतरवलीतलं आंदोलन आजही सुरु आहे. मी सुद्धा अपमान पचवला आहे. सगळ्यांचे हिशेब होणार मात्र आधी आरक्षण मिळाल्यावर. आजूबाजूला लक्ष ठेवा असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.




