“बा विठ्ठला चांगला पाऊस पडू दे”; नीरानिमगाव येथे संत सोपानकाकांच्या चरणी आमदार दत्तात्रय भरणेंचे साकडे

इंदापूर – यंदा राज्यात चांगला पाऊस पडू दे, अन्नदाता असलेला बळीराजा सुखी समाधान होऊ दे, असे साकडे संत सोपान काका महाराजांच्या पालखीतील चरण पादुकांवर माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी घातले.
नीरानिमगाव (ता. इंदापूर) येथे श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीचे स्वागत माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे यांनी केले. संत सोपान काका पालखी रथाचे सारथ्य आमदार भरणे यांनी केले. पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते या वेळी सन्मान करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन रणजीत घोगरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, तसेच सराटी, बावडा, लाखेवाडी परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले, इंदापूर तालुका खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. याच तालुक्यातून संत तुकाराम महाराज, संत सोपान काका, संत निळोबाराया, संतराज महाराज, संत मुक्ताबाई, संत गुलाब बाबा अशा विविध साधुसंतांच्या पालखी श्रीक्षेत्र पंढरीकडे जातात. नागरिक प्रशासन शेतकरी मनोभावे वारकऱ्यांची सेवा करत अन्नदान करतात. राहण्याची व्यवस्था करतात. एवढेच काय दरवर्षी या सोहळ्याची आतुरतेने प्रत्येक नागरिक वाट पाहत असतो.
हरिनामातून मिळणारी ऊर्जा अखंड मनाला आनंद देते. संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आगामी काळात या पालखी सोहळ्यास इंदापूर तालुक्यात उत्तम प्रकारची वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने, नागरिकांच्या वतीने अधिकची काळजी घेतली जाईल. संत सोपान काका पालखी विसावा ठिकाण, तसेच मुक्कामी ठिकाण येथे पाणी, विज, अन्नदान याची कुठेही कमतरता राहिलेली नाही; परंतु सोहळ्याबरोबर चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी इतर सुविधा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.
लहान मुलांबरोबर खेळण्यात दंग
संत सोपान काका पालखीचा विसावा निर निमगाव चौकात गोडलिंब परिसरात असतो. या ठिकाणी लहान मुलांसाठी अनेक खेळणी उभारलेली असतात. आमदार भरणे या ठिकाणी पालखी पालखी स्वागतासाठी हजर असल्याने बाल चिमुरड्यांनी मामा खेळण्यात बसा असा हट्ट धरला, लगेचच आमदार भरणे यांनी थेट करमणुकीच्या खेळण्यात जाऊन लहान मुलांबरोबर बसून आनंद घेतला.





