कोल्हापूर: राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी, तिजोरीचा मालक आपल्याकडेच आहे, असा स्पष्ट इशारा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला दिला आहे. गडहिंग्लजमधील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी धाराशिवमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी, “माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तुम्ही माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभे राहिल्यास, विकास बारामतीसारखा करू शकतो,” असे विधान केले होते. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “विरोधक म्हणतील की त्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत. पण तुमच्या हातात चाव्या असल्या तरी, त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे.” भाजप – राष्ट्रवादी नगरपरिषदेत आमने-सामने : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि अजतिदादांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आमने-सामने उभे आहेत. तसेच मोठ्या संख्येने नगरसेवक पदासाठीही आमनेसामने आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन (लोकसभा, विधनासभा, स्थानिक स्व. संस्था) भाजप सरकार करण्याचा मानस आहे. भाजप नेते जोमाने प्रचाराला लागले असून, विरोधकांसह युतीतील शिवसेना, एनसीपी यांच्यावरही दबाव वाढवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.