खासदार डॉ. कोल्हे : प्रदूषित “इंद्रायणी’चे बैठकीत उमटले पडसाद आळंदी – शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या इंद्रायणी नदीची अवस्था बिकट झाली आहे. भामा-आसखेडमधून पाणी योजना मार्गी लागली नसल्याने आळंदीकरांना इंद्रायणी प्रदूषित, रसायन मिश्रित पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. नागरिकांचा यामुळे संताप वाढत असून त्याचे पडसाद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या आळंदी येथील बैठकीत दिसून आला. आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व त्यांचे पती माजी नगरसेवक अशोक उमरगेकर हे खासदारांचा सत्कार करण्यास गेले असता खासदारांनी आळंदीला शुद्ध पाणी मिळु द्या, मग सत्कार स्वीकारू असे म्हणत सत्कार नाकारला. अखेर पुष्पहार न स्वीकारता कोल्हे यांनी उमरगेकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी स्वीकारली. खासदारांच्या या निर्णयाचे बैठकस्थळी टाळ्यांचा कडकडाट करत उपस्थितांनी स्वागत केले; मात्र नगराध्यक्षांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत बैठकीतून काढता पाय घेतला. खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की बैठक ही मतदारसंघातील चाकण, आळंदी, राजगुरूनगर पालिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी होती. येथील मुख्याधिकारी व विभाग प्रमुख यांच्याशी मी चर्चा केली आहे. लवकरच प्रत्येक पालिकेसाठी स्वतंत्र बैठक लावणार असून त्यात नागरिकांच्या समस्या सविस्तर जाणून घेणार आहे. आळंदी शहराचा पाणी व कचराप्रश्न बिकट असून पाणीप्रश्न माझ्यासाठी सध्या अधिक महत्त्वाचा आहे. चाकण शहराचा विकास आराखडा नागरिकांना विश्वासात घेऊन करण्यात आलेला नसून त्यावर मी लवकरच आढावा घेणार आहे. राजगुरूनगर शहराची देखील कचरा समस्या बिकट असून या तिन्ही शहरात सध्या नागरिक व प्रशासन यांच्यात कचरा व्यवस्थापनावरून दुमत असल्याचे दिसून येते कचरा व्यवस्थापन प्रक्रिया राबवताना नागरिकांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. इंद्रायणी नदी सुधार योजना माझ्यासाठी महत्त्वाची असून सध्या ती राबविण्याबाबत मी आग्रही आहे. त्यासाठी पाठपुरावा देखील सुरू असून लवकरच नदीच्या प्रदूषणाची सविस्तर पाहणी करणार आहे. “त्यांनी’च पाणी योजनेला स्थगिती दिली आळंदी शहरात आलेल्या खासदार डॉ.कोल्हे यांचे स्वागत करणे हे माझे शहराची नगराध्यक्षा या नात्याने काम होते. ते मी पार पाडले; मात्र खासदारांच्या या कृत्यावर मी नाराज असून त्यांच्याच महाविकास आघाडीच्या सरकारने मार्गी लागलेल्या वर्कऑर्डरवर आलेल्या आळंदी शहराच्या पाणी योजनेला स्थगिती दिली आहे. यामुळे कामासाठी आमचे सत्कार नाकारायचे व दुसरीकडे कामांना स्थगिती द्यायची हे योग्य नाही. त्यांनी योजनेची स्थगिती उठवावी तसा पाठपुरावा करावा, अशी माझी विनंती असून त्यांच्या माध्यमातून पाणीयोजना मार्गी लागल्यास आम्ही आळंदीकरांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करू. तसेच आळंदी विकासाचा विकास आराखडा तयार करून तो दिल्लीत त्यांच्याकडे सादर करणार असून त्यांनीही त्याला सहकार्य करावे, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी नमूद केले.