“सबक का बदला लूंगा, फिर लौटूगा”; चिट्ठी लिहून हॉस्टेलमध्येच विद्यार्थ्याने घेतला गळफास

हिंगोली : परभणीतील राजे संभाजी गुरुकुलमधील एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणारा हा विद्यार्थी मूळचा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आत्महत्या करणारा विद्यार्थी मूळचा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील आहे. रामू बळीराम गायकवाड असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यावेळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. मात्र, त्यातील मजकुरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या हिवरखेडा येथील रामू गायकवाड याने हॉस्टेलमधील एका रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी त्याने गळफास घेतला. मात्र, सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याची माहिती आहे. आत्महत्या केलेल्या रामूचे वडील शेतकरी आहेत. तीन बहिणी आणि एकुलता एक असलेला रामू याला शिक्षणासाठी वडिलांनी परभणी येथील राजे संभाजी गुरुकुल येथे ठेवले होते. मागील तीन ते चार दिवसापासून तो तणावांमध्ये असल्याचे त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या त्याच्याच गावाकडील विद्यार्थ्यांनी सांगितले. या तणावातूनच त्याने टोकाचे पाऊल उचललं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
सुसाइड नोटमुळे निर्माण झाले अनेक प्रश्न…
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर एक सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये “सबका / सभीका बदला लूंगा, फिर लौटूगा” असे लिहिले आहे त्यामुळे रामूच्या आत्महत्येला जबाबदार कोण, कोणाच्या त्रासातून त्याने हे पाऊल उचलले आणि कोणाचा बदला घेण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
“आज या दुर्देवी घटनेनंतर रामूच्या हॉस्टेलच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी विद्यार्थी राहत असताना ही घटना कशी घडली यावर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडली आहे. सुरक्षा रक्षक असता तर कदाचित रामू टोकाचे पाऊल उचलेले नसते. आता पोलिसानी तात्काळ कठोरपणे कार्यवाही करावी व जे कोणी या प्रकरात दोषी असतील त्यांना तात्काळ सजा मिळाली पाहीजे आमचे तर लेकरू गेले मात्र इतरांचे मुले या गुरुकुल मध्यें शिक्षन घेत आहेत त्याना तरी चांगल्या प्रकारे सुरक्षा देण्यात यावी.”
माधव गायकवाड मु हिवरखेडा ता सेनगाव .जि .हिंगोली





