Pune District : बिबट्याचा धुमाकूळ अन् नागरिकांत घबराट; बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून धरला

पुणे : जिल्ह्यात मानवी वस्तीवर बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. वनविभागाची तोकडी यंत्रणा, त्यात बिबट्याचे हल्ले सुरू असल्याने ऐन दिवाळीत शिरूर तालुक्यातील जांबूतमध्ये बिबट्याने एका महिलेचा बळी घेतला. तर खेड तालुक्यातील रेटवडी येथे शेतात नऊ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला झाला. मात्र, वडिलांच्या धाडसामुळे मुलाचा जीव वाचला आहे. शिरूरमध्ये करंदीत बिबट्याचा थरार अनुभवयास मिळाला. संतप्त ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह घटनास्थळावर ठेवून पंचतळे येथे जेजुरी- बेल्हे राज्यमार्ग रोखून धरला.
(दि. १२) ऑक्टोबर रोजी पिंपरखेड येथे शिवन्या बोंबे या चिमुकलीवर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी आहे.
दरम्यान, खेड तालुक्यातील रेटवडीत वडिलांबरोबर शेतात फुले तोडण्यासाठी गेलेल्या एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
मात्र, वडिलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुलाचा जीव वाचला. रेटवडी येथील कोल्हेवस्ती, सतारकावस्ती या परिसरात चार महिन्यांपासून चार बिबट्यांचा वावर आहे. गुरुवारी (दि. २३) दुपारी दत्तात्रय जाधव यांचा मुलगा स्वराज दत्तात्रय जाधव (वय ९) वडिलांबरोबर शेतात फुले तोडत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वराजवर हल्ला केला.
वडिलांनी फावड्याच्या मदतीने बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवले. स्वराजला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
संतप्त गावकऱ्यांना आश्वासन
यावेळी संतप्त नागरिकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्यानंतर घटनास्थळी खासदार अमोल कोल्हे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राऊत, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे, प्रांत पूनम अहिरे, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी भेट देत पार्श्वभूमी समजून घेतली. यावेळी पुढील आठ दिवसांत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा करून जांबूत येथे बैठक घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.





