कल्याणगड परिसरात बिबट्यांचा वावर

वाठार स्टेशन – कोरेगाव तालुक्यातील सातारारोड, पळशी, कोलवडी, अनपटवाडी परिसरात तसेच कल्याणगड डोंगरावर बिबट्यांचा वावर असल्याचे रविवारी निदर्शनास आले. पवनचक्क्यांसाठी तयार केलेल्या रस्त्यावर दोन बिबटे उन्हात बसल्याचे एका वाहनचालकाच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी ही बाब वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाने त्याची खातरजमा केली. परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी केले आहे.
कल्याणगड परिसरात खेड- बर्गेवाडी फाट्यापासून डोंगर माथ्यावर पवनचक्की बसवणाऱ्या कंपन्यांनी डोंगरामध्ये घाट रस्ता तयार केला असून तो रस्ता खडखडवाडी आणि कोलवडीच्या माथ्यापर्यंत जातो. एक रस्ता कल्याणगडावरील मंदिर परिसरात जातो. या रस्त्यावर पवनचक्कीशी निगडित वाहतूक दररोज सुरू असते. रविवारी एका वाहनचालकाला या रस्त्यावर दोन बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसले.
त्याने आपले वाहन थांबविले व आपल्या सहकाऱ्यांसह बिबट्यांची छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे त्याने व्हॉट्सऍपद्वारे ग्रामस्थांना पाठवली. ग्रामस्थांनी वन विभागाला बिबट्याच्या वावराची माहिती दिली. वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी वनपाल तानाजी मोहिते, एस. एस. निकम व वनरक्षक व्ही. बी.नरळे, वनमजूर मदने यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले. त्यांनी बिबट्यांच्या पावलांचे ठसे पाहिले. एकूणच या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पळशी वनक्षेत्रात कोलवडी गावच्या हद्दीत बिबट्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्रामस्थांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी. बिबट्या रात्रीच्या वेळी सक्रिय असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे. पाळीव प्राण्यांना सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावे, दरवाजे व्यवस्थित लावून घ्यावेत, असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी केले.





