हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील धार, माथा, रुपूर शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गुरुवारी आढळून आले असून या भागातील शेतकरी व शेतमजूरांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील धार, माथा रुपूर शिवारातून पूर्णा नदी वाहते. या नदीला पाणी असल्यामुळे आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पाणी पिण्यासाठी आला होता. तर बुधवारी रात्रीच्या सुमारास देखील काही शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला. त्यानंतर या प्रकाराची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलीक होरे, वनरक्षक रेखा नागरगोजे, गांजवे, वनपाल माधव जावडे यांच्या पथकाने तातडीने या भागात भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पूर्णा नदीच्या काठावर दाट झाली असून या सदर ठिकाण सुरक्षित असल्यामुळे बिबट्या आला असावा असा अंदाज बांधला जात आहे. नदीच्या परिसरात वाळू असल्यामुळे बिबट्याच्या पायाचे ठसे घेता आले नाहीत. तर मागील दोन दिवसांत या परिसरात बिबट्याच्या हल्यामुळे जनावर ठार झाल्याची घटना नसल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. या भागात बिबट्या आल्याचे स्पष्ट होत असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बिबट्या कधीही एकाच ठिकाणी जास्तकाळ वास्तव्यास राहात नाही. मात्र त्यानंतरही शेतकरी व शेतमजूरांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतात जाताना शेतकरी व शेतमजूरांनी एकटे जाऊ नये तसेच शेतात जाताना आवाज करावा ज्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही. तसेच शेतात काम करताना आवाज करावा व शक्यतो खाली बसून काम करणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.