सागरेश्वरच्या अभयारण्यात आढळला बिबट्या; रानगव्याचेही झाले दर्शन

सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या सागरेश्वर अभयारण्य क्षेत्रांमध्ये बिबट्या अर्थात लिओपार्डचे दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. या अभयारण्यात बिबट्याच्या पाठोपाठ रानगव्याचेही दर्शन झाल्याने सर्वांना आनंदाचे उधाण आले आहे. ही माहिती निसर्ग अभ्यासक सुनील करकरे (संचालक, निसर्ग कोल्हापूर) यांनी दिली आहे. हे भारतातील एकुलते एक मानव निर्मित अभयारण्य आहे हे विशेष!

सर्व साधारणपणे १९७०च्या दशकामध्ये कराड – कडेगाव रस्त्यावर देवराष्ट्रे गावाजवळ पत्रकार असलेले निसर्ग प्रेमी धों. म. मोहिते यांच्या एकट्याच्या प्रयत्नातून सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती करण्यात आली होती. या अभयारण्याच्या निर्मितीला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचेही मोठे पाठबळ मिळाले होते.

या परिसरात साधे गवतही नव्हते. अगोदर वृक्ष लागवड करून अभयारण्यात सुरवातीला काळवीट, चितळ आणि सांबर या प्राण्यांना मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. कालांतराने त्यांची मुक्तता करण्यात आली.

सध्या या अभयारण्यामध्ये रान डुक्कर, चितळ, सांबर, काळवीट, साळिंदर, रानमांजर, ससे असे अनेक वन्यजीव आढळतात. मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये या परिसरात मार्जार कुळातील मोठा प्राणी दिसला नव्हता.

मात्र वनखात्याने या अभयारण्य क्षेत्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे यांमध्ये बिबट्याचे अस्तित्व दिसून आल्याने वन्यजीव प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच रानगवे या अभयारण्यात फिरतानाचे व्हिडिओसुद्धा समाज माध्यमांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. ज्या जंगलांमध्ये अशा प्राण्यांचे अस्तित्व आढळते ते जंगल समृद्ध जंगल समजले जाते.

त्यामुळे सागरेश्वरचे अभयारण्य आता एक समृद्ध जंगल म्हणून ओळखले जाऊ शकेल, असा विश्‍वास सुनील करकरे यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही ककॅमेऱ्यात घेतलेली दृश्य आणि छायाचित्रे समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहेत. तसेच वनक्षेत्रपाल आणि अन्य वनाधिकारी यांच्यावर वन्यजीवप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अजितकुमार पाटील, महादेव मोहिते, उत्तम सावंत आणि वनरक्षक शिंदे यांनी ही छायाचित्रे सार्वजनिक केली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.