पूर्व हवेलीत बिबट्याची दहशत; वाडेगावात शेळ्या-मेंढ्यांवर प्राणघातक हल्ला

वाघोली – पूर्व हवेली मधील केसनंद मांजरी याबरोबरच वाडेगाव परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून नागरिक भयभीत झाले आहेत. तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
केसनंद मांजरी परिसरात यापूर्वी बिबट्याला नागरिकांनी पाहिले होते. काल बुधवारी (दि 11) रात्री अकराच्या सुमारास वाडेगाव येथील जवळपास 11 शेळ्या मेंढ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असून तीन जखमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
बिबट्याकडून प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांवर तसेच रात्री अप रात्री शेतीचे काम करणारे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“केसनंद, वाडेगाव व इतर भागात तातडीने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड झाले आहे. वनविभागाने तातडीने योग्य ती पावले उचलावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.” – प्रमोद हरगुडे (माजी सरपंच, केसनंद ग्रामपंचायत)





