जांबूत परिसरात बिबट्याची दहशत कायम; नागरिक भयभीत, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

जांबूत : शिरूर तालुक्यातील जांबूत परिसरात बिबट्याचा मानवी वस्तीवरील उपद्रव थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन दिवसांत पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीपासून मुक्ती मिळावी, यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
जांबूत-फाकटे रस्त्यावरील जोरीवस्ती येथे संतोष पांडुरंग जोरी यांच्या पाळीव कुत्र्यावर संध्याकाळी उजेड असताना घराशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि कुत्र्याच्या गळ्यातील लोखंडी बेल्टमुळे कुत्रा थोडक्यात बचावला. दुसऱ्या घटनेत दशरथ जोरी यांच्या घराशेजारी सकाळी बिबट्याने उकिरड्यावर कोंबडीवर झडप घालून तिला ठार केले. तसेच, बाबाजी मारुती जोरी यांच्या गोठ्यावर दोन बिबट्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण जाळीच्या कंपाऊंडमुळे हल्ला अयशस्वी झाला.
जांबूत परिसरात बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्ती, घरांचे अंगण आणि शेतांच्या कडेला बिनधास्त फिरताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत आहेत. गेल्या काही वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात अनेक दुर्दैवी मृत्यू झाले असून, लहान मुले, पशुधन आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. तरीही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिक संतोष पांडुरंग जोरी म्हणाले, “वनविभागाने आमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. बिबट्याच्या भीतीमुळे भीतीचे वातवरण आहे. हल्ल्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पिंजरे लावावेत.” वनविभागाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, अशी मागणी जोरीवस्तीतील नागरिकांनी केली आहे.





