Leopard News – कुकडीचा डावा कालवा, आणे-माळशेज पट्टा, पिंपळगाव जोगा कालवा परिसर आणि पुणे-नाशिक व कल्याण-अहिल्यानगर महामार्गालगतच्या आळेफाटा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. जंगलांचा परिसर कमी होणे आणि मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे बिबट्या सुरक्षित आसऱ्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञान आणि जनजागृतीचा प्रभावी मार्ग अवलंबला आहे.वन विभागाने शाळा, ग्रामसभा आणि शेतकरी गटांमध्ये बिबट्या अभ्यासक विद्या अत्रेय यांचा माहितीपट दाखवण्यास सुरुवात केली आहे. बिबट्या मुळात क्रूर नसून तो केवळ स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो, हे यातून पटवून दिले जात आहे. तसेच, जुन्नर उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत विशेष प्रशिक्षित लेपर्ड रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली आहे.या टीमकडे अत्याधुनिक पिंजरे, ट्रँक्विलायझर गन आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅन उपलब्ध असून, जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर या चार तालुक्यांसाठी ही टीम अहोरात्र कार्यरत आहे.बिबट्या आढळल्यास गर्दी न करता वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. शेत परिसर स्वच्छ ठेवणे, रात्री एकटे न फिरणे आणि संयम राखणे या त्रिसूत्रीचा वापर केल्यास बिबट्याचा त्रास कमी होऊ शकतो. ट्रँक्विलायझर गनच्या वापरामुळे आता बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या जेरबंद करणे शक्य झाले आहे. वन विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधील भीती कमी होऊन बिबट्यासोबत सहजीवन जगण्याबाबतची समज वाढत आहे. जंगल वाचलं, तर बिबट्या जंगलातच राहील… भीतीपेक्षा माहिती, घबराटीपेक्षा संयम आणि गर्दीपेक्षा सहकार्य हाच बिबट्या-मानव संघर्ष टाळण्याचा खरा मार्ग आहे. जर आपण जंगले वाचवली, तर बिबट्या मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होईल.