अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार ; नवीन कात्रज बोगद्याजवळील घटना

पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कात्रज नवीन बोगद्याजवळ घडली. गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणाची नोंद भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंबर यांनी दिलेल्या माहितीनूसार, कात्रज घाटात एक बिबट्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा त्यांना बिबट्या रस्त्याच्या कडेला निपचीत पडलेला आढळला. त्याच्या डोक्‍याला मार लागला होता.

याची खबर तातडीने वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याची तपासणी केली. तेव्हा तो मृत असल्याचे आढळले. मृत बिबट्याचा ताबा वन विभागाने घेतला आहे.

एक वर्षे वयाचा नर बिबट्या : एम.जे.सणस(वन परिक्षेत्र अधिकारी, पुणे)

मृत झालेला बिबट्या हा एक वर्षे वयाचा नर आहे. यापरिसरात जंगल भाग असल्याने बिबट्याचा वावर असू शकतो, मात्र नागरिकांकडून आजवर बिबट्या दिसल्याची तक्रार आली नव्हती. मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे नियमाप्रमाणे दहण केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.