प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर शहरालगतच्या अण्णापूर गावच्या ढग्या डोंगरालगतच्या उसाच्या शेतामध्ये आज सकाळी दोन ते अडीच वर्षे वय असलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाला याबाबत माहिती मिळताच वनरक्षक गणेश झिरपे,दिनेश बोरड हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ढग्या डोंगरा येथील उसाच्या शेतात बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला. या बिबट्यावर शिरूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिंपरखेड,काठापूर,जांबुत, टाकळीहाजी, आमदाबाद, मलठण, कवठे येमाई,सविंदणे तसेच शिरूर शहरालगतच्या परिसरात बिबट्यांचे दर्शन घडत असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील घोडनदी काठी असलेल्या सूरजनगर व सुशीला पार्क भागात बिबट्या दिसल्याने शहरातील लोकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर वनविभागाने त्या परिसरात पिंजरा लावून पहारा वाढवला आहे. शहरालगत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने नागरिकांच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. काहींचे म्हणणे आहे की, परिसरातील डोंगररांग व नदीकाठचा भाग हा बिबट्यांसाठी नैसर्गिक अधिवास बनला असून, शिकार व पाण्याच्या शोधात ते शहराच्या सीमेपर्यंत पोहोचत आहेत. वनविभागाचे अधिकारी म्हणाले की, बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारणाने, याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नये आणि बिबट्याच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला कळवावे.