पुणे जिल्हा | हरणी परिसरात बिबट्या कमबॅक

वाल्हे, (वार्ताहर) – ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून हरणी जवळ भगतवस्ती (ता. पुरंदर) येथील शेतकरी महादेव शिवाजी यादव यांच्या गोठ्यातील कालवडीवर हल्ला करून कालवड ठार केले. मागील दोन वर्षांपासून प्रथमच हरणी परिसरातील बिबट्या आढळून आला होता.
दरम्यान, कासरवड-परिंचे हा रस्ता ओलांडताना व्हिडिओ, चारचाकी वाहनातील तरुणांनी काढून सोशल मिडीयावर टाकला होता. दरम्यान, माळरानावर असलेले जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याने नागरिकांमधून चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर परिसरातील नागरिकांकडून दिवस-रात्र पहारा देऊन जनावरांसह, नागरिकांचे रक्षण केले होते. यानंतर, जवळपास दोन वर्षांनंतर हरणी परिसरात पुन्हा बिबट्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होत असून यामुळे वस्तीतील घराशेजारील गोठ्यातील कालवडावर बिबट्याकडून हल्ला होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शेतकरी महादेव यादव यांच्या गोठ्यातील नऊ महिने वयाचे कालवड बिबट्याने हल्ला करून गोठ्यापासून जवळपास 150 फूट अंतरावर ओढत नेले होते. सकाळी, शेतकरी यादव यांना गोठ्यात गेल्यानंतर रक्त पडलेले आढळून आले. दरम्यान रक्ताच्या खुणांच्या दिशेने मार्ग काढून पुढे गेले असता, कालवड मृत अवस्थेत आढळून आले.
यावेळी, शेतकरी महादेव यादव यांनी हरणी गावचे पोलीस पाटील धनंजय यादव व सरपंच धनंजय यादव यांना फोन करून माहिती दिली. सरपंच व पोलीस पाटील यांनी वनविभागस माहिती दिल्यानंतर वनपाल अनिल खोमणे, गार्ड गणेश तांबे, नवनाथ भांदलकर,अक्षय जाधव, सुनिल खोमणे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
यावेळी, शेतकरी महादेव यादव, द्वारकाबाई यादव, पोलीस पाटील धनंजय यादव, चंद्रकांत यादव, तात्याबा यादव, अमोल यादव, आदित्य यादव, सुयश यादव, आदेश यादव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बिबट्या व अन्य हिंस्र प्राणी गोठ्यात जाऊ नये, यासाठी गोठे बंदिस्त करावेत. शक्यतो गोठ्यामध्ये विजेची सुविधा सुरू ठेवावी. रात्रीच्या वेळी एकट्याने न फिरता समुहाने फिरावे, शक्यतो रात्रीच्या वेळेस मोठे आवाज करणारे फटाके वाजवावेत. – अनिल खोमणे, वनपाल

