वाघोली : अष्टापूर तालुका हवेली येथील खोल शेत वस्ती येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. गेल्या वर्षभरापासून अष्टापुर गावांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. याच महिन्यामध्ये खोल शेतीतील महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली होती. दोन दिवसांपूर्वी अष्टापूर येथील पठार वस्ती येथे उसाच्या शेतामध्ये बिबट्यांची लहान पिल्ले आढळून आली होती. त्यामध्ये एक पिल्लू वनविभागाने रेस्क्यू केले होते. अष्टापुर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच पुष्पा सुरेश कोतवाल व सर्व सदस्यांच्या मागणीनुसार वन विभागाकडे व शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्याकडे त्या महिलेस नुकसान भरपाई या मागणीचे पत्र दिले होते. या मागणीचा विचार करून आमदार माऊली आबा कटके यांनी या महिलेला नुकसान भरपाई म्हणून शासनातर्फे पाच लाखाचा धनादेश मिळवून दिला होता.