प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबट्याचा शहरातील वावर गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे, हे खरे आहेच. परंतु, आता बिबटे थेट घरात घुसून माणसाच्या जिवावरच उठल्याचे गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांवरून दिसून येते. शिरूर येथील जांबूत आणि पिंपरखेड येथे या आठवड्यातच घडलेल्या दोन घटनांनी तर त्या भागातील नागरिक भयभीत झाले असून आता थेट याठिकाणी दहशत पसरवलेल्या बिबट्याला मारण्याचेच आदेश वनविभागाने दिले आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे बहुतेक मानवी मृत्यू घरांच्या जवळ झाले आहेत, यावरून असे दिसून येते की, हा संघर्ष शेती क्षेत्रांच्या पलीकडे गेला आहे आणि आता तो मानवी वस्त्यांशी अधिक जवळून जोडलेला आहे. शहर परिसरात बिबट्यांचा लक्षणीय वावर आहे. इंद्रायणी आणि मुळा-मुठा या दोन्ही नद्या तसेच मोठे पाणवठे, हे अशा हॉटस्पॉट्सपैकी एक आहेत जिथे बिबट्यांची उपस्थिती दिसून येते. हे पाणवठे आणि वनस्पती बिबट्याला फिरण्यासाठी अतिशय सुरक्षित आहेत. मांजर, भटके कुत्रे आणि इतर काही लहान प्राणी यासारखे सहज अन्न उपलब्ध असणे आणि मानवी वस्तीत भक्षक असणे यामुळे शहरी भागात बिबट्यांची संख्या वाढत आहे. यातील बहुतेक बिबट्या हे सुरक्षित अधिवासात म्हणजे शहराच्या आजूबाजूची मनुष्यवस्ती जन्मल्यापासूनच पाहात आले आहेत.मानवी वस्तीच्या आजूबाजूच्या भागात मांजर, कुत्री आणि बकऱ्यांना बिबटे हे सहज मारून खातात आणि आता अशाच जीवनशैलीची सवय झाली आहे. विमानतळ परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून एक बिबट्या फिरत आहे. मात्र, त्याला अद्यापपर्यंत जेरबंद करण्यात वनविभागाला किंवा अन्य रेस्क्यू टीमला यश आले नाही. तो त्याभागातील भटके कुत्रे आदी प्राण्यांना आपले भक्ष्य बनवत आहे. त्यांना पुन्हा जंगलात स्थलांतरित करणे हा योग्य पर्याय असू शकत नाही कारण ते त्यांच्या अस्तित्वासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे त्यांचे निर्बिजीकरण हा एक पर्याय सध्या वनविभागापुढे असून, याबाबत जोरदार मागणी केली जात आहे.