न्हावरे : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात बिबट्याची दहशत समोर आली आहे. येथील एमआयडीसी रोड लगत राहणाऱ्या बालाजी गायकवाड यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन जर्सी कालवडींवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी रोड लगत भाऊसाहेब वाळुंज, संपतराव वाळुंज तसेच मोहन वाळुंज यांच्या शेताच्या तसेच घराच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. येथील शेतकरी निवास वाळुंज हे द्राक्षाच्या बागात ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी करत असताना अचानक त्यांना समोर बिबटया दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरची रेस वाढविली. त्या आवाजाने बिबटया घाबरुन पळुन गेला. तसेच येथील शेतकरी मोहन वाळुंज आठ दिवसांपुर्वी रात्री ८ च्या सुमारास गावात चालले असता. बिबट्याने त्यांच्या दुचाकी गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी मोहन वाळुंज यांनीही गाडी वेगात पळविल्याने पुढील अनर्थ टळला. आज (दि २५) रोजी पहाटे दोन जर्सी कालवडीवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वनविभागाने येथे तत्काळ सापळे लावण्याची तसेच गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.