प्रभात वृत्तसेवा उदापूर – अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर अहिनवेवाडी फाटा येथील माऊली कृषी केंद्राजवळ आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून खताची गोणी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक झडप घातल्याची घटना घडली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. निलेश सीताराम डोके (रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर) हे दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडक दिल्यानंतर बिबट्या तिथून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून ओतूर-जुन्नर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.