मल्हारपेठ (वार्ताहर) – कराड-पाटण महामार्गावरून शनिवारी (दि. 13) रात्री दुचाकीवरून निघालेल्या आबासाहेब चव्हाण (वय 50, रा. विहे, ता. पाटण) यांच्यावर 9.30 च्या सुमारास विहे घाटानजीक बिबट्याने अचानक झेप घेतली. त्यांनी हेल्मेट घातले होते.
बिबट्याचा पंजा हेल्मेटवर पडल्याने चव्हाण यांचा जीव वाचला. चव्हाण हे महावितरण कंपनीच्या मल्हारपेठ येथील कार्यालयात वॉचमन आहेत. ते कामावर निघाले असताना ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आबासाहेब चव्हाण हे नेहमीप्रमाणे काल रात्री 9.30 च्या सुमारास दुचाकीवरून कामावर निघले होते. ते विहे घाटात आल्यानंतर बिबट्याने धावत्या गाडीवर अचानक झेप घेतली. चव्हाण यांनी हेल्मेट घातले होते. बिबट्याने हेल्मेटवर आपला पंजा मारला. बिबट्याच्या नखांमुळे हेल्मेटवर ओरखडे पडले आहेत.
या हल्ल्यानंतर चव्हाण यांनी आरडाओरडा केला; परंतु जवळपास लोकवस्ती नसल्याने कोणीही मदतीला आले नाही. नहिंबे चिरंबे येथे पोहोचल्यावर तेथील बसथांब्यानजीकच्या ढाब्यावर जाऊन चव्हाण यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. विहे घाट ते स्मशानभूमीपर्यंत बिबट्याचा वावर असल्याचे चव्हाण यांनी वनाधिकाऱ्यांना सांगितले.